श्री चोपडाई देवी श्रावण षष्टी यात्रा माहिती

चोपडाई देवी माहिती

ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे.श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ. श्री महादेव मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिमाभिमुख उभी आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून केदारेश्वराच्या मंदिरापेक्षा दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. देवीच्या समोर मंडपात चार खांब असून ते चारीही पुरुषार्थाचे अंग आहे.चोपडाई देवी मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे .

काय आहे श्रावणषष्ठी यात्रेचे महत्व

श्री जोतिबा देवाच्या चरित्रात षष्ठी या तिथीला खूप महत्त्व आहे. पहिली चैत्र शुद्ध षष्ठी ज्या दिवशी केदारलिंगाचा अवतार झाला तर दुसरी श्रावण शुद्ध षष्ठी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रेचे वैशिष्टय हे की, श्रावणषष्ठी दिवशी देवींने रत्नासुराचा वध केला म्हणून श्रावणषष्ठीला जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची यात्रा भरते.

श्रावणषष्ठी यात्रेची कथा

देव ज्योतिबानं रक्तभोज असूर मारला तेव्हा रत्नासूर युद्धाला आला. नाथांनी सात दिवस युद्ध केले शेवटी रत्नासूराचा वध शक्तीच्या हातून आहे हे जाणून तिला साद घातली. जगदंबा चोपडाई आली आणि श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी रत्नासूर महिषासुराचे रुप घेऊन धावून आला. तेव्हा देवीने अष्टभुजेच्या रुपात विक्राळ रुपात असूराचा वध केला. असूराचा वध झाला पण देवी शांत होईना. तिच्याच तेजाने इतर जग व्याकूळ होऊ लागलं. इतक्यात रक्तभोज दैत्याची पत्नी जलसेना सुवर्णपात्रात  जल रुप झाली. तीचे जळ घेऊन रत्नासुर पत्नी चंद्रसेना सुवर्ण पिंपळाचे  ३६० द्रोण भरुन घेऊन आली आणि अष्टगंध रुपी रक्तभोजाला त्या जळात मिसळून जणू तीने दोघा पत्नीचे ऐक्य केले. त्याबरोबरच रत्नासूराच्या किरीटाची ३६० रत्ने, ३६० दुर्वादल शमीपत्र त्या जलसेनेच्या द्रोणात घालून चोपडाई समोर आली. देवीला पाहून चंद्रसेना आपण अष्टभाव युक्त झाली तोच तीचे प्राण चोपडाई चरणी विलीन झाले आणि तिच्या शरीराला ३६० पदरी पवित्रक अर्थात पोवत्याचा आकार आला. तेव्हा देवांनी चोपडाईला शांत करण्यासाठी लिंबू वाळा  शमी अशा वस्तूंसह जलसेनेच्या अर्थात देववापीच्या तीर्थाने तीनशे साठ द्रोणांनी अभिषेक केला. जगदंबा शांत झाली आणि याच तीर्थात पोवतेरुपी चंद्रसेनेला स्नान घालून चोपडाईच्या गळ्यात स्थान दिले. यावर चर्पटांबेने भक्तांना आश्वस्त केलं  कृपा प्रसाद देऊन अभय दिलं. तीच प्रथा आजही श्रावण षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने पाळली जाते.

श्रावण षष्ठीचा कार्यक्रम

चोपडाई देवीची अशी महापूजा बांधण्यात येईल. ती वर्षातून एकदाच बांधली जाते. रात्रभर मंदीरात चोपडाई देवीचा जागर सोहळा होत असतो. या दिवशी भाविकांनी उपवास करावा.  या दिवशी तिन्ही सांजेला चोपडाईच्या मंडपात ढोल मांडून स्तुती केली जाईल. गाभाऱ्यात अभिषेक घालून देवीची लिंबू वाळा शमी या वस्तूंनी पूजा बांधण्यात येईल. आरती होईल हा सोहळा रात्रभर चालेल. सकाळी सूर्योदयाला आरतीची मंदिर प्रदक्षिणा होऊन षष्ठीची सांगता होईल.

Please Follow US & Like Me

Leave a Comment