श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथा रुपात | Shri Gurucharitra Adhyay 14 Story

गुरुचरित्र – अध्याय चौदावा (१४)

श्री गणेशाय नमः I श्रीसरस्वत्यै नमः I श्रीगुरुभ्यो नमः I

नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I
प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II

जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I
पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I
पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II

ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I
गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II

ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I
तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II

गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I
पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II

तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I
भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II

ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव विप्र करी नमन I
माथा ठेवून चरणी I न्यासिता झाला पुनःपुन्हा II ८ II

जय जया जगद्गुरू I त्रयमूर्तींचा अवतारू I
अविद्यामाया दिससी नरु I वेदां अगोचर तुझी महिमा II ९ II

विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I
धरिला वेष तूं मानुषी I भक्तजन तारावया II १० II

तुझी महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I
मागेन एक आता तुम्हांसी I तें कृपा करणे गुरुमूर्ति II ११ II

माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I
इहे सौख्य पुत्रपौत्री I उपरी द्यावी सद्गति II १२ II

ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I
सेवा करितो द्वारयवनी I महाशूरक्रुर असे II १३ II

प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी I घात करितो जीवेसी I
याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे मज आजि II १४ II

जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I
भेटी जाहली तुमचे चरण I मरण कैचे आपणासी II १५ II

संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभयंकर आपुले हाती I
विप्रमस्तकी ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II १६ II

भय सांडूनि तुवां जावे I क्रुर यवना भेटावे I
संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांपाशी II १७ II

जंववरी तू परतोनि येसी I असो आम्ही भरंवसी I
तुवां आलिया संतोषी I जाऊ आम्हीं येथोनि II १८ II

निजभक्त आमुचा तू होसी I पारंपर-वंशोवंशी I
अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II १९ II

तुझे वंशपारंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I
अखंड लक्ष्मी तयां घरी I निरोगी होती शतायुषी II २० II

ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I
जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II २१ II

कालांतक यम जैसा I यवन दुष्ट परियेसा I
ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II २२ II

विमुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपत I
विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरूसी ध्यातसे II २३ II

कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I
श्रीगुरूकृपा होय ज्यासी I काय करील क्रुर दुष्ट II २४ II

गरुडाचिया पिलीयांसी I सर्प तो कवणेपरी ग्रासी I
तैसे तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II २५ II

कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I
श्रीगुरुकृपा होय ज्यासी I कलिकाळाचे भय नाही II २६ II

ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I
काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II २७ II

ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन असे तो काय I
श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे मुख्य भय नाही II २८ II

ऐसेपरी तो यवन I अन्तःपुरांत जाऊन I
सुषुप्ति केली भ्रमित होऊन I शरीरस्मरण त्यासी नाही II २९ II

हृदयज्वाळा होय त्यासी I जागृत होवोनि परियेसी I
प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II ३० II

स्मरण असे नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I
छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II ३१ II

स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I
लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II ३२ II

येथे पाचारिले कवणी I जावे त्वरित परतोनि I
वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप दे तो तये वेळी II ३३ II

संतोषोनि द्विजवर I आला ग्रामा वेगवत्र I
गंगातीरी असे वासर I श्रीगुरुचे चरणदर्शना II ३४ II

देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी तो भावेसी I
स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II ३५ II

संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I
दक्षिण देशा जाऊ म्हणती I स्थान-स्थान तीर्थयात्रे II ३६ II

ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I
न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II ३७ II

तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I
संसारसागर तारका I तूंचि देखा कृपासिंधु II ३८ II

उद्धरावया सगरांसी I गंगा आणिली भूमीसी I
तैसे स्वामी आम्हासी I दर्शन दिधले आपुले II ३९ II

भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सोडणे काय नीति I
सवे येऊ निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II ४० II

येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I
संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II ४१ II

कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I
पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II ४२ II

आम्ही तुमचे गांवासमीपत I वास करू हे निश्चित I
कलत्र पुत्र इष्ट भ्रात I मिळोनी भेटा तुम्ही आम्हां II ४३ II

न करा चिंता असाल सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I
म्हणोनि हस्त ठेविती मस्तके I भाक देती तये वेळी II ४४ II

ऐसेपरी संतोषोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I
जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र II ४५ II

समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I
प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II ४६ II

नामधारक विनवी सिद्धासी I काय कारण गुप्त व्हावयासी I
होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II ४७ II

गंगाधराचा नंदनु I सांगे गुरुचरित्र कामधेनु I
सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामकरणीस II ४८ II

पुढील कथेचा विस्तारू I सांगता विचित्र अपारु I
मन करूनि एकाग्रु I ऐका श्रोते सकळिक हो II ४९ II

इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः

II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथासार

दत्त संप्रदायातील लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरूचरित्र. गुरूचरित्र १५ व्या १६ व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहलेले होते. गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. यात एकूण ५३ अध्यात आहेत आणि प्रत्येक अध्याय वाचण्याचे फळ देखील आहे. त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.
सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार, विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात. दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ज्या व्यक्तींना संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नाही. पण त्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे. त्या व्यक्तींनी हा 14 वा अध्याय वाचला तरी चालतो. हा 14 वा अध्याय यांची नियमित वाचन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत व इच्छित फळ आपल्याला मिळणार आहे

सायंदेवाचे प्राणसंकट कसे टळले हे कथा रुपात

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदत्तात्रेय महाप्रभूंनी लोकोद्वारासाठी भारतवर्षात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती व श्रीस्वामी समर्थ असे क्रमाने तीन अवतार घेतेल. श्रीगुरुचरित्र या ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे.

श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध अशा कृष्णसरस्वतींकडून विधिवत संन्यासदीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले. ते वासरब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी उदरव्याधीने गांजलेल्या एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तेथे सायंदेव नावाचा एक ब्राह्मण स्नानासाठी आला होता. तो ग्रामाधिकारी म्हणून काम पाहत असे.

त्याच्यासमोर मोठेच भयसंकट उभे होते. श्रीगुरूंची सोज्वळ मूर्ती व तपश्चर्येच्या तेजाने झळकणारी मुद्रा पाहून त्याला हायसे वाटले. चित्त प्रसन्न झाले. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व आपल्या घरी भिक्षेस येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे श्रीगुरू त्याच्या घरी गेले असता सायंदेवाने व त्याची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. श्रीगुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणास सुग्रास भोजन दिले. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली.

सायंदेवाचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी त्याला ” तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील.”, असा आशीर्वाद दिला. सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, “गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त होवो; पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूरआहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे. मी त्याच्याकडे गेलो की, माझा घात निश्चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार?”

ते ऐकून श्रीगुरूंना सायंदेवाच्या धैर्याचे मोठे कौतुक वाटले. समोर एवढे भीषण संकट असूनही त्याने आत्मीयतेने सेवा केली म्हणून ते अधिकच प्रसन्न झाले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले, ‘सायंदेवा, तू अगदी निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्रपौत्रादिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे.’

श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायंदेवांची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायंदेवाला पाहिले तो काय ! तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे, हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठितझाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरश: थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे, असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्या वेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायंदेवाचे पाय धरले. ” तुम्हाला येथे कोणी बोलावले ? कृपा करून आपल्या घरी जा.”, असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला.

प्राणसंकट टळले होते. श्रीगुरूंचे सामर्थ्य किती अगाध आहे याची सायंदेवाला प्रत्यक्ष प्रचिती आली होती. ‘श्रीगुरू हेच उद्धारकर्ते आहेत, आता त्यांचीच सेवा करायची.’, असा दृढनिश्चय करून तो श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावतनदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, “गुरुदेव, आपण माझे रक्षणकर्ते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्याबरोबर न्या.” तेव्हा श्रीगुरू म्हणाले, ” सायंदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. पंधरा वर्षांनी परतून येऊ, तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्या वेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर. “श्रीगुरूंनी सायंदेवाचे सांत्वन करून त्याला घरी पाठविले. गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले. कालांतराने तो सहपरिवार गाणगापुरास जाऊन राहिला. श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला.

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १४ वाचनासाठी खालील लिंकवर क्लिक करा

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा कथा रुपात | Shri Gurucharitra Adhyay 14 Story

Please Follow US & Like Me

Leave a Comment