Shri Shubhrai Math
सद्गुरु श्रीशुभराय महाराज यांची “शुभराय मठ” ही वास्तु सोलापूर येथे आहे. सद्गुरु शंकर महाराज भक्त परिवारासाठी अतिशय परिचयाचे स्थान आहे.धनकवडीच्या सद्गुरु शंकर महाराजांचे आवडते स्थान म्हणून अनेक लोक या स्थळाला भेट देत असतात.महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवल्या आहेत.येथील मठाधिपती वंदनीय शोभाताई म्हणजेच माई या शुभराय मठ परंपरेच्या आजच्या आठव्या प्रमुख व उत्तराधिकारी आहेत. आज आपण या लेखात सद्गुरु शुभराय महाराज यांच्या दिव्य चरित्र पाहणार आहोत.
श्री शुभराय महाराज यांचे सुरुवातीचे जीवन
श्री शुभराय महाराजांचा जन्म सन 1750 मध्ये तमिळनाडूमधील मालूर या गावी झाला. महाराजांच्या वडिलांचे नाव श्री गंगाधर व आईचे नाव सौ. पन्नामा असे होते. हे दाम्पत्य अतिशय धर्म पारायण आणि आचारनिष्ठ असे होते. त्याने आपल्या बाळाचे नाव सुब्बाराव असे ठेवले. ते एक सदन ब्राह्मण कुटुंब होते. बाळ सुबरावांची बुद्धी अतिशय कुशाग्र व तलक होती. वयाच्या आठव्या वर्षी त्याचें मौजीबंधन करण्यात आले. पुढील शिक्षणासाठी त्यांना गुरुकुल मध्ये पाठवण्यात आले. तेथील शिक्षण, ज्ञान त्याने आपल्या बुद्धी लवकरच आत्मसात केले. शिक्षणाबरोबरच सुबराव हे जन्मताच उत्तम गात असत तसेच चित्र ही काढत असत. गुरुकुलुरुकुल मधून परतल्यानंतर त्यांचा विवाह सण 1971 साली सुलक्षनी, या कन्याशी करण्यात आला.
श्रीमहाराज हे वेदशास्त्रसंपन्न तर होतेच पण त्याबरोबर कला व राजकारण यातही निष्णात होते. त्यांच्या या तेजाची व बुद्धीमत्तेची चर्चा मैसुरच्या सुलतान टिपू याच्या पर्यंत पोचली. सुलतान हा कलारसीक असल्यामुळे त्याने श्रीसुब्बारावांना आपल्या दरबारात बोलवून घेतले व आपल्या दरबारात सामिल होण्यास सांगितले. आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन तरुण श्रीसुब्बाराव हे टिपू सुलतानच्या दरबारी रुजु झाले. आपल्या तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर ते नायब दिवाणापर्यंत जाऊन पोचले. याच काळात श्रीमहाराजांनी अनेक भाषांचे ज्ञान अवगत करुन घेतले. मुस्लिम दरबारात कार्य करतांना ही त्यांची धर्मनिष्ठा व साधना खंडित झाली नाही. पहाटे ध्यान करुन देवांना “मला पुढील मार्ग दाखवा ” अशी ते कळकळीने प्रार्थना करत असत. त्याकाळात होणारे परकीय आक्रमण व होणारे धर्मांतरे बघून त्यांचे मन अधिकच उद्विग्न झाले. गुरु भेटीसाठी त्यांचे मन आतुर होऊ लागले. अशा उद्विग्न मनःस्थितीत प्रपंचाचा त्याग करावा व आपले आत्मकल्याण करावे हा त्यांनी मनोमन निश्चय केला. आपल्या आराध्य श्रीहरी ला ते याबाबत कळकळीची प्रार्थना करु लागले. लवकरच त्या प्रार्थनेला श्रीहरींनी प्रतिसाद दिला व “आता येथे राहू ये सर्व संग परित्याग करावे”अशी आज्ञा दिली. लवकरच नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी आपल्या माता-पिता,पत्नी ,धन ,संपत्ती यांचा त्याग केला. हा त्याग अनंत जन्माच्या तयारीचे द्योतकच आहे. ही इतकी सोपी गोष्टी नक्कीच नाही. घरात असलेली कट्यारधारी श्रीमारोतीरायांची मुर्ती फक्त त्यांनी सोबत घेतली व ते घोड्यावर स्वार होऊन निघाले. टिपु ने त्यांचा शोध घेतला व पण कुणाच्याही हाती लागले नाही. मजल दरमजल करत ते महाराष्ट्रात आले.
श्री शुभराय महाराजांचा महाराष्ट्रातील प्रवास
अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी या गावी ते सन १७७६ रोजी येऊन पोचले. तेथील गावकऱ्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था म्हैसलगी गावाचे ग्रामदैवत असलेल्या मारोतीरायांच्या मंदिरात केली. त्यावेळी त्यांची दाढी वाढली होती व हातातील पळी पंचपात्र,डोक्याचा पंचा,वैरागी वेश व मुखावरील तेज बघून सर्वांना त्यांच्यातील दिव्यत्व लगेच लक्षात येत असे. श्री महाराज तेथेच राहत मारोतीरायांची पूजा करत व गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत. तेथे अनेक दिवस देवांची सेवा केल्यावर मारोतीरायांनी त्यांना कोल्हापूर ला जाण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे ते कोल्हापूरात आले. त्यांनी जगदंबेचे दर्शन घेतले व आईला पुढील मार्ग दाखविण्याची प्रार्थना केली. आईने त्यांना “तू पंढरपूरला जा” अशी आज्ञा केली. सन १७७९ रोजी महाराज पंढरपूर येथे पोचले. तिथे भगवंतांच्या स्मरणात ,अखंड भजनात ते तल्लिन झाले. लवकरच पंढरपूर येथे त्यांची आपले सद्गुरु थिमप्पा यांच्याशी भेट झाली. थिमप्पा हे रामदासी होते. त्यांनी श्री सुब्बारावांवर कृपा अनुग्रह केला. त्यांनी गुरु जवळ राहून मनोभावे सेवा केली. अनुग्रह कृपा झाल्यावर सद्गुरु थिमप्पांनी त्यांना “तू आता पंढरपूर येथे राहू नकोस! हे तुझे कार्यक्षेत्र नाही. पंढरपूर जवळील सोनलगी म्हणजे सोलापूर हे पवित्र क्षेत्र तुझे कार्य क्षेत्र आहे.” गुरु आज्ञा प्रमाण मानून सन १७८० ला श्रीशुभरायांनी पंढरपूर सोडले व ते सोलापूर येथे येऊन पोचले. सोलापूरात आल्यावर ते हत्तीबावडी या विहिरीजवळ राहू लागले. तेथेच ते साधना ही करीत असत. पहाटे विहीरीच्या कपारीत बसून ते योगसाधना करु लागले. आपल्या मृदू वाणी ,प्रेमळ अंत:करणामुळे सर्व लोक त्यांना बाबा ,महाराज म्हणू लागले. आता त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडू लागला .लवकरच ते सुब्बारावांचे सर्वांचे शुभराय महाराज झाले .
शुभराय मठाची स्थापना
महाराज नित्य भिक्षा अन्नच घेत. गावातील श्रीपाणीभाते नावाच्या गृहस्थांची महाराजांच्या चरणी अनन्य निष्ठा जडली व त्यांनी महाराजांना राहण्यासाठी एक विठ्ठल मंदिर बांधले. महाराज अतिशय उत्तम भजन करत .महाराजांचे भजन ऐकण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अनेक लोक मंदिरात येऊ लागले. महाराज त्यावेळी गावाच्या फार बाहेर राहात असत व त्यामुळे भिक्षेसाठी त्यांची बरीच पायपीट होत असे. अर्थातच महाराजांच्या लेखी त्याचा मागमूसही नव्हता तरी त्यांचे एक भक्त श्रीआबासाहेब कुंडले जे भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांनी ही बाब हेरली. गावातील भक्तांशी चर्चा केली व सर्वानुमते महाराजांना गावात येण्याची प्रार्थना केली. किल्ल्याजवळील चिंचवृक्षाची विस्तिर्ण जागा महाराजांना दान देण्याचे ठरले. जवळच सिद्धेश्वरांचे मंदिर व तलाव होते. महाराजांनी हीच जागा आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडली. याच जागेवर आज “शुभराय मठ” ही वास्तु उभी आहे. महाराजांनी आपल्या बरोबर आणलेली कट्टयारधारी मारोतीरायांची मूर्ती तिथे ठेवली व आता या स्थळी त्यांनी देवांची पूजा सुरु केली. महाराजांची देवपूजा,भक्ती व सद्गुरुंनी दिलेले साधन अखंड सुरू होते.
श्री शुभराय महाराज यांना विठ्ठल साक्षात्कार
श्रीशुभराय महाराजांच्या कार्याला सुवर्ण झळाळी देणारी अलौकिक घटना घडली. एके दिवशी प्रभातकाळी श्रीशुभरायांपुढे भक्तवत्सल भगवान पंढरीनाथ सगुण रुपाने उभे राहिले. श्रीभगवंत शुभरायांना म्हणाले, “तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. आता तुझी अखंड भक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे. पंढरपूरच्या पुंडलिकाच्या डोहात मी आहे. चंद्रभागेच्या त्या डोहात मी वालूकामय मुर्ती रुपात आहे. ती मुर्ती तु इथे मठात घेऊन ये.” आषाढ शुद्ध दशमी ला शुभराय महाराजांना हा साक्षात्कार झाला. देवांनी आपली पुजा आषाढी एकादशीला करण्याची आज्ञा केली. दुसर्या दिवशी सकाळी महाराजांनी हा दृष्टांत शिष्यांना सांगितला. परंतु एका रात्रीत विठ्ठल पंढरपूरातून आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण शुभराय महाराजांनी “पंढरपूरात तात्काळ जाऊन माझा प्राणसखा असलेल्या विठ्ठलाला आणावे” अशी शिष्यांना आज्ञा केली. त्या शिष्यांमध्ये एक मल्लिकार्जुन शेटे नावाचे शिष्य होते. त्यांनी हे शिवधनुष्य उचलण्याची तयारी महाराजांपुढे विनम्रतेने दर्शविली व महाराजांनी ही सेवा घडवून घ्यावी याचा आशिर्वाद ही मागीतला. शेटेंना महाराजांनी आशिर्वाद दिला व सकाळी निघण्याची आज्ञा केली. सर्व सोलापूरात ही बातमी पसरली व हाच सर्वांच्या चर्चेचा विषय बनला.देव पंढरीहून सोलापूरात येणार या बातमीने सर्वांचे चित्त भावविभोर केले. सर्व लोक देवांची डोळ्यात जिव ओतून प्रतिक्षा करत होते. इकडे शेटे सोलापूरात पोचले. त्यांनी चंद्रभागेत स्नान केले व पुंडलिकाच्या डोहात जाऊन देवांचे आवाहन केले. देवांचे नाम घेता घेता त्यांनी वाळूत हात घातला तर वाळून एक टणक भाग हाताला लागतात.तो त्यांनी उचलला आणि बाजुला जाऊन बघतात तर का प्रत्यक्ष वालुकामय श्रीभगवंतांचा विग्रह. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना भावावस्थेत जणू समाधीचं लागली होती. त्यांनी नंतर विलंब न करता देवांना त्यांनी छातीला कवटाळले व ते तात्काळ सोलापूर ला नाघाले. वेशीजवळ सर्व लोक देवांच्या स्वागतासाठी जमले होतेच. यथावकाश शेटे सोलापूरात येऊन पोचले. सर्वत्र आनंदी आनंद झाला.शेट्यांनी दुरुन महाराजांना हात दाखविला. जवळ पोचताच ते खाली उतरले व त्यांनी देवांचा विग्रह महाराजांच्या हातात दिला. महाराजांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी तो विग्रह हृदयाशी लावला. महाराजांनी मग देवांना पालखीत बसवले. सुवासिनींनी देवांना ओवाळले. वाजत गाजत हरीनामाच्या गजरात देवांना मठात घेऊन आले. महाराजांनी देवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सन १७८५ ला श्रीपंढरीनाथांची शुभराय मठात प्रतिष्ठापना झाली. महाराजांनी पुढे देवांचे चरण धातुचे केले. देवांसाठी सुंदर देवघर बनविले. रोज ती मुर्ती ताम्हाणात घेऊन तिचा अभिषेक महाराज करत व सुंदर अलंकारांनी सजवून देवांना गाभार्यात विराजमान करीत. पुढे विस्तिर्ण मठाचे काम झाले. महाराजांना निवासासाठी एक खोली , सुंदर मध्यभागी देवघर बांधण्यात आले. महाराजांनी पांडुरंगाची सगुण उपासना सुरु केली. देवांची काकड आरती ते शेजारती यथासांग ते करु लागले.देवांची जयंती व संतांचे पुण्यतिथी उत्सव सुरु केले. उपजतच कलायोगी असलेले शुभराय महाराज आता देवापुढे आपली कला प्रगट करु लागले. देवांच्या विविध दशावतारांची चित्रे काढून त्याने देवांना सजवू लागले.( आजही ही अतिशय दुर्मिळ आणि सुंदर चित्रे बघायला मिळतात. आज हा एक अमुल्य ऐतिहासिक ठेवा झाला आहे.) पुढे श्री.हरिपंततात्या राळेरासकरांनी यांच्या सात पिढीतील प्रासादिक कालियामर्दनाची मूर्ती देवांच्या रथयात्रेसाठी उत्सव मूर्ती म्हणून ती महाराजांना दिली. आजही ती मूर्ती आपल्याला बघण्यास मिळते. गुरुदीनलाल कलवार यांनी महाराजांना लाकडी रथ अर्पण केला. हा रथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला होता. हा वैशिष्ट्यपूर्ण रथ बांधण्याचे काम महाराजांनी सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाकडे महाराजांनी दिले हा रथ आजही शुभराय मठात आहे.
भक्तांना अनुग्रह व भक्तांचा उद्धार
सोलापूरच्या राम जोशी यांच्या तमाशात चिमाबाई नावाची नर्तकी होती.ती अधूनमधून महाराजांच्या दर्शनास मठात येत असे.तिच्याबरोबर तिची कुर्ती गुलबी ही येत असे.एक गृहस्थ तिला म्हणाले, “तुम्ही येता ते येता व बरोबर कुत्रीला ही आणता ,तिला नका आणत जाऊ.” चिमाबाईला फार वाईट वाटले.परत येतांना त्यांनी त्या कुत्रीला बांधून ठेवले.ज्या वेळी ती महाराजांपुढे आलं ,तेव्हा महाराज म्हणाले, “आज तुझी गुलबी नाही आली?” ती म्हटली “ती येत होती मीच तिला बांधून ठेवले.” महाराज तिला म्हणाले , “तुझी गुलाबी मोठी अधिकारी आहे.महाराजांनी तिला आज्ञा दिली की “उद्या तिला घेऊन ये.” दुसर्या दिवशी चिमा गुलबीला घेऊन मठात आली.महाराजांनी गुलबीला आवाज दिला, “ये गुलबे ये.अशी आमच्या जवळ ये.” गुलबी महाराजांच्या जवळ शेपटी हलवीत आली.महाराजांनी मोठ्या मायेनं तिला थोपटले.म्हणाले, “ऊठ बेटा ,संपला तुझा इथला वास ऊठ”गुलबी उठली. तिनं महाराजांना तीन प्रदक्षिणा घातल्या.तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं.ती पुन्हा महाराजांच्या पायाजवळ आली.तिनं एकदा मुखाकडे पाहिलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं ते पुन्हा उचललंच नाही.गुलबीला महाराजांनी मुक्ती दिली होती.पुढे महाराजांनी चिमाबाईला ही अनुग्रह देऊन तिचा उद्धार केला होता.
एकदा मठात प्रवचन संपल्यावर महाराज उपस्थितांना म्हटले की आता देवांच्या आज्ञेनुसार हा देह ठेवायचा वेळ जवळ आला आहे.महाराजांचे हे शब्द जणू तप्त पार्यासारखे भक्तांच्या कानात पडले.सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले.ही वार्ता हा हा म्हणता सर्व सोलापूरात पसरली.सर्वत्र खिन्नतेचे वातावरण तयार झाले.सर्व शिष्यांना जवळ बोलावून महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिले.शेवटी आपले अंतरंग शिष्य असलेल्या रावजी बुवांना महाराजांनी बोलाविले.बुवांचा अधिकार मोठा होता.त्यांनी महाराजांची खुप सेवा केली होती.महाराज त्यांना म्हणाले, “तुमची सेवा अशीच अखंड सुरु ठेवा.या मठातील प्रत्येक उत्सव व देवपूजेची जबाबदारी तुमच्यावर सोपवित आहे.बुवांच्या पत्नी लक्ष्मीबाईंना महाराजांनी आशिर्वाद दिला व काही मागण्यास सांगितले.तेव्हा त्या माऊली साश्रुनयनांनी थरथरत महाराजांना म्हणाल्या , “महाराज आमच्या शेवटच्या पिढीतील शेवटच्या माणसाने आपली आणि विठुरायाची भक्तीच करावी.” महाराज आनंदाने तथास्तु म्हणाले.आजही बुवांची आठवी पिढी श्रीशुभांगी बुवा म्हणजेच माईंच्या रुपात शुभराय महाराजांची व विठुरायांची सेवा करत आहे.त्यानंतर सर्व शिष्य रडायला लागले.सर्वांच्या दु:खाचा बांधच मोडला.भाद्रपद वद्य दशमीचा दिवस जवळ आला.सकाळी महाराजांनी आपले आन्हीक केले.देवांची पुजा आरती केली.आनंदांने देवांचे दर्शन घेतली.या दिवशी महाराजांचे सर्व प्रिय शिष्य मठात हजर होते.माध्यन्ह आरती झाली महाराज मठातील आपल्या आसनावर जाऊन बसले.सन १८२० रोजी भाद्रपद वद्य दशमीला महाराजांनी माध्यान्हकाळी आपली प्राण ज्योत पांडुरंगाचे चरणी विलिन केले. आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन महाराज वैश्विक निर्गुण रुप धारण करते झाले.महाराजांनी मठात फक्त उत्सव व अन्नदानचं केले नाही तर आलेल्या प्रत्येकाला आपले मानले.त्याला सतत उपदेश देऊन त्याचे कल्याण व्हावे हीच अखंड भावना त्यांची असायची.असा हा सिद्धयोगी ,कलायोगी महापुरुष अनंत जिवांचा उद्धार करुन समाधिस्थ झाला.आजही अनेक लोकांना महाराजांच्या कृपेचा अनुभव येतो. महाराजांचे कार्य आजही मोठ्या प्रमाणात सुरु आहे याचा अनुभव भक्तांना येतो आहे.
शुभराय मठाचा पत्ता
157 ओप शालीमार टॉकीज दत्ता चौक दक्षिण कसबा, शिंदे वाडा , शोलापूर , महाराष्ट्रा 413001