करुणात्रिपदी – शांत हो श्रीगुरुदत्ता

करुणात्रिपदी | Karunatripadi

प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे.  त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ‘ करुणात्रिपदी ‘ होय!

करुणात्रिपदी महत्व

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी हे एक खास ठिकाण आहे कारण श्री भगवान दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी ह्या क्षेत्री बारा वर्षे तपस्या केली. दत्त महाराजच्या या पादुका अतिशय मनोहर असल्याने  त्यांना  “मनोहर पादुका” म्हटले जाते. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे दत्त संप्रदायातील एक थोर विभूती यांना नृसिंहवाडीत ‘थोरले महाराज’ म्हणून संबोधले जाते. यांनी स्वतः नृसिंह वाडीचा पूजेचा दिनक्रम ठरवला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच काकड आरतीपासून ते रात्री शेजारती पर्यंतचे सर्व उपचार येथे आजवर केले जातात.  ते स्वतः नृसिंहवाडीला ‘दत्ताची राजधानी’ म्हणून संबोधतात. इथे दररोज संध्याकाळी उत्सवमूर्ती पालखीत बसवून पालखी सेवा केली जाते. पालखी सोहळा अवर्णनीय असतो.  येथे आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडला तर बाकी वर्षभर दररोज संध्याकाळी श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.

करुणात्रिपदीची जन्मकथा

इसवी सन 1905 मध्ये विशेष उत्सवा दरम्यान पालखी प्रदर्शन चालू असताना, पुजारी गुंडोपंत खोबरे त्यांच्या हातातून अवधानाने श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली. सर्वजण घाबरून त्यावेळी वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांना भेटायला गेले. ती घटना त्यांनी वासुदेवानंद सरस्वती स्वामीना सांगितले. पुजाऱ्यांच्या कडून ही घटना ऐकल्यावर वासुदेवानंद सरस्वती स्वामी ध्यानाला बसले  ध्यानात त्यांनी दत्त महाराजांना या बाबत विचारले असता, पुजारी लोक नियमानुसार वागत नाहीत पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात , तुझी निंदा करतात. आम्हाला येथे राहायचं कंटाळा आलेला आहे .पंच नेमून परभारे व्यवस्था करावी. मग वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी पुजारांना काही नियम घालून दिले.  तसेच त्यावेळेस दत्ताची प्रार्थना करून काही पदांची रचना केली. हीच ती तीन पदांची करुणात्रिपादी म्हणून प्रसिद्ध झाले .पुढे श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी या ठिकाणी दररोज पालखीच्या तिसऱ्या प्रदर्शनाला तीन थांब्यांवर ही  करुणात्रिपादी म्हटले जाते. आज सर्व दत्तप्रभूंच्या क्षेत्रामध्ये ही करुणात्रिपदी दररोजच्या आरतीनंतर विनवली जाते . श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्रग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणात्रिपदीचे महत्व विशद केले आहे.

 

| श्री वासुदेवानन्‍द सरस्वती स्वामी रचित | करुणात्रिपदी स्तोत्र पद पहिले : शांत हो श्रीगुरुदत्ता

शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।।

तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।।

तू आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।

भयकर्ता तू भयहर्ता। दंडधर्ता तू परिपाता।

तुजवाचुनि न दुजी वार्ता। तू आर्ता आश्रय दत्ता (आश्रयदाता) ।।

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।

तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवू माथा।।

तू तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा?

 सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता?

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।२।।

तू नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी।

पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरी न च संतापी।।

गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच होऊ कोपी।

निजकृपा लेशा ओपी। आम्हांवरि तू भगवंता।।

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।३।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां।

सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा (दुसरा) त्राता।

निजबिरुदा आणुनि चित्ता। तू पतितपावन दत्ता।

वळे आतां आम्हांवरता। करुणाघन तू गुरुनाथा।।

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।

तव पदी अर्पू असार। संसाराहित हा भार।

परिहरिसी करुणासिंधो। तू दीनानाथ सुबन्‍धो।

आम्हां अघ लेश न बाधो। वासुदे-प्रार्थित दत्ता।।

शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।५।।

करुणात्रिपदी - शांत हो श्रीगुरुदत्ता

पद दुसरे : श्रीगुरुदत्ता जय भगवंता

श्रीगुरुदत्ता जय भगवंता। ते मन निष्ठुर न करी आता।।ध्रु।।

चोरे द्विजासी मारीता मन जे। कळवळले ते कळवळो आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।१।।

पोटशूळाने द्विज तडफडता। कळवळले ते कळवळो आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।२।।

द्विजसुत मरता वळले ते मन। हो की उदासीन न वळे आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।३।।

सतिपति मरता काकुळती येता। वळले ते मन न वळे की आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।४।।

श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।।

श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।५।।

करुणात्रिपदी - शांत हो श्रीगुरुदत्ता

पद तिसरे : जय करुणाघन निजजनजीवन

जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।ध्रु।।

निज-अपराधे उफराटी दृष्टी। होऊनि पोटी भय धरू पावन।।१।।

जय करुणाघन …..।।

तू करुणाकर कधी आम्हांवर। रुसशी (रुससी) न किंकर-वरद-कृपाघन।।२।।

जय करुणाघन …..।।

वारी अपराध तू मायबाप। तव मनी कोप लेश न वामन।।३।।

जय करुणाघन …..।।

बालकापराधा गणे (गणीं) जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।

जय करुणाघन …..।।

प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव। पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन।।५।।

जय करुणाघन …..।।

जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।ध्रु।।

जय करुणाघन ।।जय करुणाघन ।।जय करुणाघन ।।

 करुणात्रिपदी - शांत हो श्रीगुरुदत्ता

Please Follow US & Like Me

Leave a Comment