परमपूज्य कलावती आई | Parampujya Shri Kalavati Aai

परमपूज्य आई या आपल्या भारतात होऊन गेलेल्या अतिशय दिव्य संतमांदीयाळीतील एक अलौकिक संतरत्न आहेत. आईंनी शेकडो आर्त , जिज्ञासू, मुमुक्षू लोकांना आपल्या कृपा छत्राखाली घेऊन त्यांना कृतार्थ केले आहे. आईंचा शिष्य परिवार व त्यांच्या वर प्रेम करणारा भक्त परिवार संपूर्ण जगभरात पसरला आहे. आईच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही अनेक भक्त घेत आहेच आणि आजही “हरी मंदिर” या शक्ती केंद्रातून प.पू. आईंनी घालून दिलेली उपासना पद्धती, साधना मार्ग अविरत, अखंड सुरु आहे. आजही शेकडो लोक हरी मंदिरात जाऊन आईंच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती घेत आहेत. आईंचे श्रीमती विशालाक्षी यांनी लिहिलेले “परमपूज्य आई” हे चरित्र अतिशय दिव्य आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे. त्याच चरित्रातील काही निवडक संक्षिप्त माहितीच्या आधारे आपण परम पूज्य आईंच्या दिव्य लिला चरित्राचे स्मरण करणार आहोत.

कलावती आई जीवन परिचय

परमपूज्य आईंनी ज्या घराण्यात अवतार घेतला ते अतिशय सुसंस्कृत व सात्विक असे कल्याणपूरकरांचे घराणे होते. या घराण्यात श्रीमद् परमहंस शिवराम स्वामी हे थोर संन्यासी महापुरुष होऊन गेले. परहंस स्वामींना दोन चुलत बंधू होते. एक शामराव व दुसरे शांतमूर्ती. शामरावच्या पत्नीचे नाव रुक्माबाई होते. यांना एक मुलगा होता ज्याचे नाव बाबुराव हे बाबुराव आपल्या आईंचे पिताश्री. परंतु शामरावाचे | दुसरे बंधू शांतमूर्ती व त्यांच्या पत्नी पद्मावती यांना | संतती नव्हती. बाबुराव वयात आल्यावर त्यांचे वडिल शामराव यांचे निधन झाले. पण त्यांना त्यांचे | काका शांतमूर्तींनी वडिलाप्रमाणे प्रेम दिले. त्यांचे लग्न ही शांतमूर्तींनीच लावून दिले. बाबुरावांच्या पत्नीचे नाव होते सिताबाई. बाबुराव हो श्रद्धावान व सत्शिल असे व्यक्ती होते. लग्नानंतर आठ वर्ष झाल्यावरही संतती झाली नसल्याने त्यांनी इ.स.१९०७ साली श्रावण मासात सुपुत्रप्राप्तीसाठी सहस्त्रलिंगार्चन केले. त्याची समाप्ती अष्टमीस झाली. त्याच रात्री, “मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे” असा देवीने त्यांना दृष्टांत दिला. भगवतीचा आशिर्वाद फळाला आला व सिताबाईंना दिवस गेले. त्यांना जगावेगळे डोहाळे होऊ लागले. त्यांना तासंतास नामस्मरण करावे वाटत असे. प्रवचन, किर्तन ऐकत राहावे वाटू लागले. त्या सतत मंदिरात जाऊ लागल्या. संत | साहित्याचे वाचन करु लागल्या. लवकर नऊ महिने पूर्ण झाले व इ.स १९०८ रोजी ऋषीपंचमीच्या शुभदिवशी ब्राह्म मुहूर्तावर या सत्शिल दाम्पत्याच्या पोटी कन्यारत्न जन्मास आले. बारावे दिवशी या अलौकिक कन्येचे नामकरण करण्यात आले व तिचे नाव “रुक्माबाई” ठेवण्यात आले. पण सर्व लोक तिला बाळ याच नावाने हाक मारित. बाळ जशी जशी मोठी होऊ लागली तसे तसे तिच्यातील अलौकिक गुण सर्वांना अनुभवास येऊ लागले.प्रथम जन्मदिवशी ती बोलायला लागली व तिने पहिला उच्चारलेला शब्द होता “हरी”. पुढे सहा महिन्यांत ती सर्व काही बोलु लागली. आई वडिलांना याचे अतिशय अप्रूप वाटू लागले. बाळ तिन वर्षांची झाल्यावर शांतमूर्तींनी गोकर्ण जवळ शेत घेतले व तेथेच घर बांधून राहावयास गेले. त्यांनी बाबुराव व पूर्ण परिवारास तेथेच राहण्यास बोलाविले. घरी रोज सायंकाळी हरीपाठ होत असे.घरातील एकंदरीत हरीभक्तीच्या वातावरणामुळे बाळचेही मन हरीभक्तीकडे | वळले. लहानपणापासूनच ती अंतर्मुख होती. तिला बालपणी खेळण्यात भांडी कुंडी नाही तर देवांच्या मुर्तीच आवडत. तिला कृष्ण मुर्ती ही विशेष आवडत असे. ती मुर्ती मध्यभागी व इतर देवातांच्या मुर्ती गोलाकार ठेऊन बाळ त्या बरोबर खेळत असे. बाळचा आवाज अतिशय मधुर होता. वयाच्या पाचव्या वर्षीपासून ती कानडी , मराठी, गुजराती भाषेत भजन म्हणू लागली. तिच्या आवाजातील गोडवा, तिची श्रद्धेने भजन | म्हणण्याची पद्धत बघून मोठ्यांना तिचे अतिशय | कौतुक वाटत असे. वयाच्या सातव्या वर्षी बाळला शाळेत घातले गेले. सातव्याच वर्षी बाळला पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन व घडला होता. श्रीस्वामी महाराज बाळचा अधिकार जाणून होते. बाळचे सात्विक गुणांचे निरीक्षण ते नित्य करित असत. यामुळे त्यांनी आपल्या नित्य पुजेतील भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती बाळला दिली होती. ही गोपालकृष्णाची मूर्ती बाळचे सर्वस्व | झाली होती. बाळचा विलक्षण दैवी अधिकार कळणारा एक प्रसंग बालपणी घडला तो असा.पूर्णानंद स्वामी महाराजांकडे विनायक नावाचे एक भटजी राहत असत. त्यांच्या बायकोचे डोके एकदा फिरले. अनेक उपाय केले पण फरक न पडल्याने रोज डोक्यावर चाळीस घागरी थंड पाणी ओतण्याचा शेवटचा उपाय सुरु झाला. बरेच दिवस हे ही केले पण फरक पडला नाही. शेवटी तिला गोव्यास नेण्याचे ठरले. तेवढ्यात श्री स्वामी महाराजांनी, “येत्या सोमवारी तिच्या डोक्यावर बाळ कडून पाच तांबे पाणी घाल” असे | सांगितले. विनू भटजीने तसे केले. त्यानंतर त्यांच्या | बायकोचा त्रास हळूहळू कमी होत गेला. अशा | प्रकारे बालपणीच बाळकडून अनेक प्रकारे विविध | सेवा, उपासना, ग्रंथ वाचन, श्रवण हे सर्व घडत होते. जणू काही श्री भगवंत बाळकडून तिच्या हातून होणार्या दैवी कार्याची पूर्वतयारीच करून घेऊ लागले होते. बाळ या सर्वांत रमत असे. तिची मूळ प्रवृत्तीच या सर्व संस्कारात रममाण होण्याची होती यात शंका नाही. हरीदासांच्या किर्तनात ध्यानाची महती ऐकल्यापासून ती एकांतात ध्यान ही करु लागली.आईंच्या चरित्रातील “प्रथमोल्हास” या प्रकरणात आईंच्या वयाच्या १५ वर्षांपर्यंतच्या सर्व लिलांचा समावेश करण्यात आला आहे. ही जवळ जवळ १०० पानांची दिव्य हकीकत आहे. यात आईंनी बालपणी केलेल्या लिला, त्यांच्या सवयी इतरांशी झालेलं संभाषण, उत्कट कृष्ण भक्तीचे वर्णन व विविध प्रसंग यांचे वर्णन आहे.

वयाच्या १५ व्या वर्षी आईंचा विवाह ठरला. त्यांचा विवाह दक्षिण कर्नाटकातील कडलूर येथील पोलिस इन्स्पेक्टर एम. राजगोपाल यांच्याशी झाला.सासरी जातांना रस्त्यात हुबळी येथे सिद्धारुढ स्वामी महाराज यांच्या दर्शनास जा असे बाबुराव यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे हे दाम्पत्य श्री सिद्धारुढ स्वामी महाराज यांच्या कडे गेली. पुढे आईंना सिद्धारुढ स्वामी महाराजांचा अनुग्रह मिळला. त्यानंतर त्या अधिकच अंतर्मुख झाल्या. आता त्या अधिकाधीक कृष्ण ध्यानात निमग्न झाल्या. तसेच त्या अतिशय सुंदर व शिस्तबद्ध असा संसार करु लागल्या. त्यांचे सासरच्या मंडळी समवेत वागणे अतिशय आनंददायी होते व घरकाम ही त्या अत्यंत | शिस्तबद्ध तर्हेने करित असत. रुक्माईंना वयाच्या १७ व्या वर्षी एक मुलगा झाला ज्याचे नाव बाळकृष्ण ठेवले होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्या पुन्हा त्या गर्भवती होत्या पण अचानक एक अघटित घडले. त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय लहानच होते. या घटनेमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला व आता पतिराज्य गेले आणि यमराज्य आले. आता इथून पुढे काय मुलांना सांभाळत आपल्याला भगवंतांची सेवा करता येणार नाही असे वाटून त्या आत्महत्येस प्रवृत्त झाल्या. घराजवळील विहीरीत त्या आत्महत्या करायला गेल्या तोच तेथे एक जटाधारी साधू प्रगट झाले व म्हणाले, “माई, थांब! थांब! आत्महत्या करण्याकरीता तु जन्माला नाही आलीस. जीव देणार्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म झाला आहे.तुझ्या दुःखाचा प्रळय होण्याचा वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. यापुढे तु तिळमात्र काळजी करु नकोस. लवकर हुबळीस जा.सिद्धारुढ महाराजांच्या कृपेने तू सुखरुप | होशील.” इतके बोलून ते साधू अदृश्य | झाले. त्यानंतर मात्र त्या अगदी शांत झाल्या. त्यांना या वाक्याने आधार मिळाला व सद्गुरु नित्य पाठिशी असल्याची ग्वाही पण मिळाली. दोन | महिन्याने त्यांना मुलगा झाला. तशातच त्यांचे | वडील बाबुराव यांचे निधन झाले त्यामुळे त्या अधिकच अंतर्मुख झाल्या. आपल्या एका वस्त्रानिशी त्यांनी घर सोडले व त्या हुबळीला आल्या. तेथे गेल्यावर स्वामी महाराज त्यांची वाटच पहात होते.त्या स्वामींच्या आज्ञेने मठात राहून सेवा करु लागल्या.ही सेवा म्हणजे सद्गुरूंनी आईं कडून करुन घेतलेली तपश्चर्याच होती. आईंच्या ठाई अंतर्मुखता आता कडकडीत वैराग्याच्या रुपात प्रगट झाली. त्या एका लुगड्याचा अर्धा-अर्धा भाग करुन ते दोन भाग वापरीत. झोपायला पोते व उशीला विट घेत. दिवस रात्र त्यांच्या जिभेवर “ॐ नमः शिवाय ” हा महामंत्र असे. कामाव्यतिरीक्त त्यांच्या हातत जपमाळ असायची. आहाराकडे लक्षही नसे. कुणी दिलेच तर फळ, पोहे खजूर खात | नाहीतर आठ आठ दिवस पाण्यावर काढीत. आपल्या सेवेत त्यांनी कधीही खंड पाडला नाही. मठात पडेल ती सेवा आई करीत. त्या काम असेल तरच कुणाशी बोलत नाहीतर फक्त आणि फक्त नामस्मरण. रुक्माई म्हणजे आईंची निष्ठा, सेवा, शुद्ध भाव, प्रामाणिकपणा, | कार्यतत्परता हे गुण बघून श्री स्वामी महाराज त्यांच्यावर अत्यंत खुष होते.इ.स १९२८ साली दसर्याच्या शुभ दिनी स्वामींनी त्यांच्यावर कृपा करुन त्यांचे नाव “कलावतीदेवी” असे ठेवले व त्यांना त्यानंतर निरुपण करण्याची आज्ञा केली.गुरु आज्ञेने आईंनी त्या दिवशी “नाम संकीर्तन साधन पै सोपे” या अभंगावर निरुपण केले. नंतर वेळोवेळी आईंना स्वामी मठात किर्तन करण्याची आज्ञा करित असत. पुढे एक दिवशी स्वामी महाराजांनी आईंच्या डोक्यावर हात ठेवत त्यांच्यावर पूर्णकृपा केली. त्या कृपेनिशी आईंच्या ठाई आत्मज्ञान जागृत झाले. त्या जवळ जवळ आठ तास प्रगाढ समाधीत स्थिर होत्या. समाधी उतरल्यावर त्यांना आपला जणू नवा जन्म झाल्याची जाणीव झाली. पुढे आईंना सर्व जन माताजी या नावानेच संबोधू लागले.

पुढे श्री स्वामी महाराज आईंना वेळोवेळी मठात किर्तन करण्याची आज्ञा देत. जणू काय आईंकडून होणार्या धर्मकार्याचा हा श्रीगणेशा होता. लवकरच श्रीस्वामी महाराजांनी आईंना “मी लवकरच आता समाधी घेणार आहे.त्यानंतर तु सहा महिने | एकांतवासात राहून साधनाभ्यास कर.पुढे बारा | वर्षांपर्यंत हरिनाम व विश्वप्रेमप्रसारार्थ गावोगावी प्रमाण कर. मी सदा सर्वकाळ तुझ्या पाठीशी आहे, सन्निध आहे” असे आश्वासन दिले. पुढे लवकरच श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रावण वद्य प्रतिपदेला स्वामी महाराजांनी समाधी घेतली. आईंनी त्यानंतर एकांतवास सुरु केला . हे कठोर तप म्हणजे आईंनी केलेले दिव्यच होतं. त्यांनी या काळात इतके कठोर व त्यागमय काळ व्यतित केला की वाचुन ही आश्चर्य होते. पुढे सहा महिन्यांनी साधना पूर्ण करुन आई शिवरात्री उत्सवाला हुबळीला मठात आल्या. तिथेच उत्सवाला आलेले मद्रासचे रावबहाद्दूर एच. नारायणराव व त्यांच्या पत्नी गिरीजाबाई यांनी आईंना बेंगलोर ला येण्याची विनंती केली. ही महाराजांची इच्छाच मानून आई बेंगलोर ला गेल्या व आईंच्या प्रत्यक्ष लोककल्याणकारी कार्याला सुरुवात झाली.आई किर्तन करण्याचे कसलेही मानधन घेत नसत. या काळात आईंनी केलेले विविध चमत्कार वाचली तरी आश्चर्य होतं. आईंनी अनेकांना रोग मुक्त केले, त्यांचे दुःख दूर केले. सामान्य लोकांना हरीनामाची गोडी लावली, तसेच लोकांना समतेची, धर्माची शिकवण दिली. त्यांनी या काळात केलेला प्रचंड प्रवास व किर्तन बघितले तर थक्क व्हायला होतं. या काळात अनेक नाट्यमय घटना घडलेल्या आहेत. पण सद्गुरूंनी कृपा पूर्वक त्यांना त्यातून बाहेर काढले.

स्वामींची आज्ञा म्हणून आईंनी त्यांना एम.शिवराव यांनी दिलेली देणगी वापरुन “हरी मंदीर ” या प्रधान साधना केंद्राची स्थापना केली. त्यानंतर मात्र आईंनी कधीही कुठल्याही प्रकारचे दान स्विकारले नाही. बारा वर्षात प्रवासात संग्रहित केलेले पदं अभंग एकत्र करुन आईंनी तो परमार्थ प्रदीपक या नावने छापला. आईंनी अनेक महत्वाचे ग्रंथ रचले ज्यात परमार्थ दर्शन, सिद्धारुढ वैभव, बोधामृत, बालोपासना, कथासुमनहार, श्रीकृष्ण प्रताप या ग्रंथाचा समावेश होतो. त्यांनी शेकडो स्त्रीयांना भजनाचे महत्व पटवून देत त्यांना भजन शिकवीले. भजनाने संसारातील त्रिविध ताप ही दूर होतात याची जाणीव लोकांना करुन दिली व सर्वांना भजनाकडे वळविले. भजनाला येणार्या | लोकांकडून औषधांसाठी खर्च होणार्या पैशाची बचत व्हावी म्हणून आईंनी त्यांना औषध देण्यास सुरुवात केली. एक विलक्षण अनुभव इथे मुद्दाम मांडतो आहे. एका गोकुळाष्टमीच्या उत्सवात एक फोटोग्राफर श्रीहरी मंदीरात आले. त्यांना आईंचे काही फोटो काढायचे होते. त्यांची तयारी बघून एक जन त्यांना म्हणाले, “प्रथम आईंची परवानगी घ्या. नाही तर फोटो निघेलच असे सांगता येत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे.” पण तो | फोटोग्राफर अश्रद्ध आणि अहंकारी होता. तो म्हटला, “मी काही नव्यानेच फोटो काढीत नाहीये. आज चौदा वर्ष धंदा करत आहे.” इतक्यात आई आसनावर येऊन बसल्या. लगेच त्याने फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण फ्लॅश लाईटच लागेना. त्याचे कारण शोधून पहाण्यासाठी तो अंगणात गेला तोच तो लाईट लागला. त्याने एकापेक्षा एक महागडे कॅमेरे आणले होते.पण आईंचा फोटो घेऊ लागला की लाईट लागायचा नाही आणि अंगणात गेला की लागयचाअसे तब्बल आठ वेळा घडले. त्या ठिकाणी जवळपास चारशे/पाचशे लोक जमले होते. सर्वांमध्ये आपला अपमान झाला आहे असे वाटून तो रडकुंडीला आला. अखेरीस तो आईंपुढे हात जोडुन उभा राहिला पण तोंडातून एक शब्दही निघाला नाही. तो कापायला लागला.हे पाहून आई त्याला म्हणाल्या, ” फोटो काढण्या आधी देवांची प्रार्थना करा. परमेश्वर आपला मायबाप आहे. तेव्हा त्यांची करुणा भाकणे आपले कर्तव्य आहे.” त्यानंतर त्याला फोटो काढणे जमले व त्याने अनेक फोटो काढले. इतका विलक्षण आईंचा अधिकार होता. बेळगावात १९५७ साली फ्ल्यू ची साथ सुरु झाली. आईंचे भक्त असलेले बोहरी लोक आईंकडे तक्रार घेऊन आले. त्यांच्यातील पांडुरंग गजेश्वर हा जवळपास मृत्यू मुखी पडलाच होता तर आईंनी त्याला आपल्या स्वसामर्थ्याने नुसता अंगारा देऊन परत रोगमुक्त केले होते. बेल्लद गावातील एक कुलकर्णी बाई तिला सहा वर्ष अन्न जात नव्हते.अनेक दवाखाने केले पण काही केल्या निदान लागत नव्हते. एकदा ती तिच्या नणदे समवेत हरीमंदीरात आली तिथे तिला एकाएकी चक्कर यायला लागली. भजन आरती सुरु झाली तोच ती आळोखेपिळोखे घेऊ लागली. आई पुढे | बसलेल्या होत्या त्यांनी तिला तसेच सोडण्यास सांगितले. ती अर्ध्या तासाने भानावर आली. अष्टक झाल्यावर ती घरी गेली. रात्री सर्वांसारखे जेवन केले. दुसर्यादिवशी पासून ती कामही करु लागली.पुढे ती ठिक झाली व नियमीत भजनाला येऊ लागली. पंधरा दिवसांत ती ठणठणीत बरी झाली व आईंचा आशिर्वाद घेऊन घरी गेली. असे जवळपास शेकडो अनुभव आईंच्या चरित्रात आले आहेत.

आईंकडे दुःखनिरसनार्थ सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक येत असत. त्या सर्वांना आईंनी जवळ घेतले त्यांना दु:ख मुक्त केले व परमार्थ मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. बोहरील जातीतील आदिवासी लोक ही आईंकडे यायची. आईंनी स्वच्छता, आंघोळ यांचे महत्व त्या लोकांना  समजावून सांगितले. आईंचे वर्तन परमशुद्ध असे होते. त्यांनी काही पद ही रचली आहेत तसेच त्यांनी बरेचसे ग्रंथ ही रचले आहेत. सन १९३० पासून ते १९४२ पर्यंत आईंनी कीर्तन भजनाद्वारे विश्वप्रेमाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी आपली काया चंदनाप्रमाणे अविरत, अखंड झिजवली. आईंनी स्वतः साधन, नामस्मरण, शुद्ध आचरण स्वतः केले व नंतर दुसऱ्या कुणाला सांगितले. आईंच्या सहवासात कितीही दुर्गुणी वृत्तीचा प्राणी आला तर आई त्याला युक्तीने परमार्थाकडे वळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत. त्यांनी कधीही कुणालाही दूर केले नाही. आईंची ही भक्तवत्सलताच अनेकांनी अनुभवली होती.त्यामुळेच अनेक लोक हळूहळू भजन, नामस्मरण करण्यास उद्युक्त झाली. परम पूज्य आईंचे चरित्र हे संसार आणि परमार्थ यांचा परिपाक आहे. प्रत्येकाने प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याचा धडा आईंच्या चरित्रातून मिळतो. परम पूज्य आईंनी ८ फेब्रुवारी १९७८ माघ शुद्ध प्रतिपदा या दिवशी महासमाधी घेतली. आईंची समाधी बेळगाव ला श्रीहरी मंदीर येथे आहे.सद्गुरु श्री कलावती आईंनी हरी मंदीरातुन भजन, जपाची सुरु केलेली परम सेवा आज सर्वदूर पसरली आहे. अनेक लोकांना आईंच्या कृपा सामर्थ्याची प्रचिती आजही येते. आईंचे चरित्र इतके अलौकिक आहे की त्यातुन प्रत्येक वेळी प्रत्येकाला काही तरी मिळतच मिळतं. आईंचे चरित्र जवळपास ७०० पानांचे आहे. त्यामुळे त्यातील आईंनी लोककल्याणासाठी किंवा भक्तांना दुःख मुक्त करण्यासाठी केलेल्या दिव्य लिला या लेखात घेता आल्या नाही . तरी पुढे आईंच्या चरित्रावर लेख लिहीता आला तर त्यात काही ठळक व महत्वाचे प्रसंग जरुर मांडण्याचा प्रयत्न केला आहे

श्री कलावती देवी मंदिराचा पत्ता 

734, अंगोल में आरडी, हिंदू नगर, अंगोल , बेळगावी , कर्नाटका  590006

दर्शनाची वेळ 

मंदिर उघडे-सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत पण समाधी मंदिर दुपारी १२ ते ४.३० बंद असते.

श्री कलावती देवी मंदिरात कसे जायचे

हवाई मार्ग : सर्वात जवळचे विमानतळ बेळगावी विमानतळ आहे. जे मंदिरापासून अंदाजे 10 किमी अंतरावर आहे.

रेल्वे मार्ग :  मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन बेळगावी रेल्वे स्टेशन आहे, जे मंदिरापासून अंदाजे ४ किमी अंतरावर आहे.

रस्ता मार्ग :  कोल्हापूर पासून १०५ किमी/ २ तास. बेळगावी बस स्थानकापासून ३ किमी आहे.

परमपूज्य कलावती आई | Parampujya Shri Kalavati Aai https://newstaza24.com/shri-mhadba-patil-maharaj-dhulgaonkar/ https://newstaza24.com/narasimhanarasimha-jayanthi-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-2023-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82/

Please Follow US & Like Me

Leave a Comment