श्री म्हादबा पाटील महाराज जीवन परिचय
शेकडो वर्षा पासून या दत्त संप्रदायात विलक्षण आणि अतिशय दिव्य असे महापुरुष होऊन गेले. त्याच महापुरुषांच्या मांदियाळीतील झालेले एक अतिशय विलक्षण आणि थोर महापुरुष म्हणजे सद्गुरु श्री महादबा पाटील ,महाराज.दत्तसंप्रदायातील पराकोटीचे विलक्षण सिद्ध अवतारी सत्पुरुष होते. श्री महादबा महाराज अतिशय प्रसिद्धिपराङमुख होते. श्री दत्तप्रभुंची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्यावर संस्थानाच्या भक्तनिवासाच्या अगदी जवळ आपल्याला एक भव्य असं मंदिर लागतं ते मंदीर म्हणजे श्रीमहादबा पाटील महाराजांचे समाधी मंदिर आहे.
महादबा पाटील महाराज हे एक विदेही, एकांतप्रेमी, आत्मानंदात लिन, भक्तांनी आठवण काढताच भक्ताकडे धाव घेणारे असे अलौकिक सत्पुरुष होते. धुळगाव (सोनी) तालुका. तासगाव, जिल्हा सांगली या गावी श्री बाबगोंडा पाटील व सौ.बायाक्का माता या दत्तभक्त दांपत्यापोटी जन्मसिद्ध असलेल्या महादबा पाटील महाराजांनी अश्विन शुद्ध त्रयोदशी सोमवार दि. ९ ऑक्टोबर १९९६ साली जन्म घेतला.त्यांचे कुटुंब अतिशय धार्मिक आणि दत्तावर विश्वास ठेवणारे होते. त्यांचे वडील 40 वर्षांपासून दर पौर्णिमेला श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला पायी जात असत. महाराजांचा जन्म झाला तेव्हा लोकांच्या लक्षात येऊ लागले की त्यांच्यात एक विशेष प्रतिभा आहे. त्याला आत्मज्ञान आणि आत्मशक्ती प्राप्त करण्यासाठी इतर सत्पुरुष आणि संतांप्रमाणे साधना करण्याची आवश्यकता नव्हती, कारण तो सिद्ध जन्मला होता. ते म्हणत ‘मी शिकुन आलोय’ ते जन्मसिद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य गोष्टींची गरज नव्हती. महादबा महाराज हे स्वयंभू सिद्ध व आत्मज्ञानी होते. ते बारा वर्षांचे असताना त्यांनी घर सोडले आणि आत्मसमाधानाचे जीवन जगले. ज्या लोकांनी त्याची आठवण ठेवली त्यांना अलौकिक चांगल्या गोष्टी घडताना दिसतील.
महाराज मितभाषी होते, मोजकेच बोलत. ते शाकाहारी होते. महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, शर्ट, करवतकाठी उपरणे, वुलनचा कोट, डोक्याला लाल रुमाल असा त्यांचा वेश असायचा. त्यांच्या हातात सदैव एक काठी असायची. चेहर्यावर लहान मुलासारखी निरागसता होती.श्रीम्हादबा पाटील महाराज हे नेहमी विदेही अवस्थेत वावरत. त्यांचा मुख्यत: वावर मिरज, सांगली, इचलकरंजी, कुरुंदवाड, नृसिंहवाडी व सर्वत्र असे.श्रीम्हादबा महाराजांचा सर्वत्र वावर पायी, सायकल, मोटर सायकल, टांगा, बैलगाडी मिळेल त्या वाहनाने असे. आपल्या भक्तांना थोडाही त्रास न होवू देण्याची त्यांची इच्छा असे. शेवटपर्यंत त्यांनी एक रूपायाला हात लावला नाही. एक रुपायाही जवळ ठेवला नाही. असे ते निरीच्छ होते. खटाव (नांद्रे) येथील प. पू. श्रीरामानंद महाराज खटावकर यांचा महादबा महाराजांवर अनुग्रह झाला होता. तरी महाराजांच्या जीवनात साधकावस्था आढळत नाही. श्रीरामानंद महाराज हे नाथ परंपरेतील असल्यामुळे पाटील महाराज हे नाथ परंपरेशी अनुबंधित असावेत. तसे पाहायला गेले तर महाराजांचे शिक्षण हे मराठी चौथी पर्यंत झाले होते परंतु आश्चर्य म्हणजे ते भक्तांना दासबोध, ज्ञानेश्वरीतील एखादा अध्याय काढायला लावून त्यांच्याकडून एखादी ओवी वाचुन घेत आणि आपण त्या ओवीचा अर्थ सोदाहरण समजावुन सांगत. त्यांना अशा सर्व ग्रंथांचे ज्ञान होते व ग्रंथातील सर्व श्लोक, ओव्या ही त्यांना माहीत असत.
श्रीमहाराजांचा अधिकार फार उच्च कोटीतील होता. महाराज त्रिकालज्ञानी होते. ते भक्तांना सांसारीक, पारमार्थीक आणि भौतीक मार्गदर्शन करीत व त्यांच्या अडीअडचणी सोडवत असत. क्वचितच लोक त्यांच्या कडे अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी येत. त्यांनाही महाराज कृतकृत्य करत. महाराजांकडे सर्व जातीधर्माचे लोक येत असत. गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता. कर्मकांडाचा प्रचार त्यांनी कधीही केला नाही. महाराजांच्या भक्ताबद्दल बोलायचे झाले तर असंख्य लोकांचा ते आधार होते, महादबा महाराज भक्तांना नामस्मरण करायला, सदग्रंथाचे वाचन, प्रवचन- किर्तन ऐकायला सांगत असत. ‘सच्चाने वागा, लबाडी करु नका. कुणाला फसवु नका. फुकटचे खाऊ नका, संपत्तीचे प्रदर्शन करु नका. माणुसकीने वागा.’ हाच आपल्या भक्तांना त्यांचा उपदेश असे. बुवाबाजी करणार्यांच्या अंगावर ते धावून जात. समाधी घेण्याच्या वर्षभर आधी ते स्वत: प्रत्यक्ष भक्तांच्या घरी जाऊन अगदी भक्तांना शोधुन काढून त्यांना आपल्या सेवेची संधी दिली. महाराजांच्या खिशात सदैव एक डबी ठेवलेली असे त्यात नृसिंहवाडीचा अंगारा सदेव त्यांच्या बरोबर असे. भक्तांनी आपल्या अडचणी सांगीतल्या की महाराज त्या डबीतील अंगारा काढुन भक्तांला लावत आणि त्यामुळे भक्तांच्या अडचणी दुर होत असत. महाराजांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही. ते कधीही धनाला शिवले नाही. ते देवावतारी असुन सुद्धा सामान्यासारखे राहिले. अखंड ५० ते ५५ वर्षे ते मिळेल त्या साधनाने भक्तांकडे जाऊन त्यांना आशिर्वाद व अंगारा देऊन अडचणीतुन सुटका करीत. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हेच आपले काम आहे असे ते मानत असत. भक्तसुद्धा महाराजांच्या बरोबर राहुन त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत असत. महाराज पौर्णिमेस नरसोबा वाडीला व संकष्टीला मिरजेतील थोर संत अण्णाबुवांच्या मठात नेमाने जात व राहत असत.
श्री महादबा पाटील महाराज समाधी मंदिर
महाराजांनी वाडीत स्वत: मठ बांधून घेतला, पण कोणासही शिष्य केले नाही. त्यांनी स्वतः १९८१ साली ट्रस्टची स्थापना केली व मठाची व्यवस्था ट्रस्ट कडे सोपवली. मठामध्ये त्यांनी समाधीची जागा निश्चित करुन या ठिकाणी समाधीस्त करा असा आदेश दिला होता. ज्यावेळी महाराजांनी समाधी घेतली त्यावेळीमहाराजांनी आधी सांगितल्याप्रमाणे नृसिंहवाडी येथील चिंचेच्या झाडाखाली समाधी देण्याचा विचार मंडळी करतच होती तोच वाडीतील काही ब्रह्मवृंदांनी इथे आजवर कुणालाही भुगर्भ समाधी न दिल्याचा व तसे करण्यास आक्षेप घेतला. तसा ताम्रपट ही दाखविला त्यामुळे डी वार पाटील साहेबांचाही नाइलाज झाला. काही भक्तांनी आपली जमिन देऊ केली. पण सद्गुरूंनी सांगितले तेच ब्रह्मवाक्य. या न्यायाने श्रीपुजारी व चाफळकर यांनी महाराजांनी सांगितले त्याच जागी देहाला समाधी द्यायची हा आग्रह धरला. श्री चाफळकर यांनी दत्तगुरुंना कौल लावायचे ठरविले. देवांनी उजवा कौल दिला व समाधी चिंचेच्या झाडाखालीच द्यावी हा विचाराला परवानगी दिले. त्यामुळे सर्वांनी महाराजांना आज दीसते त्या जागेवर चिंच वृक्षाखाली भूगर्भ समाधी दिली. दिवस व वेळ ठरवून सर्वांना अगोदर सांगून व टिपून ठेवून परमपूज्य सद्गुरु श्री महादबा पाटील महाराजांनी नृसिंहवाडीच्या अधिकृत मठात जेष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेस शके १९०४ रविवार दि. ६ जुन १९८२ राजी सकाळी ६ वाजून ५ मिनीटांनी दत्त मंदिरात घंटानाद होत असतांना समाधी घेतली. समाधीत असतांनाही आजही महाराज अखंड आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज आहेत. आजही मी चैतन्य रुपाने वाडीतच आहे. या आपल्या आश्वासनाचा अनुभव प्रत्येक भक्ताला देतच आहेत.
महादबा पाटील महाराज मंदिर पत्ता
नरसोबा वाडी, महाराष्ट्र ४१६१०४
दर्शनाची वेळ
मंदिर उघडते – सकाळी ६ ते बंद – रात्री ९ वाजेपर्यंत
महादबा पाटील महाराज मंदिराला कसे जायचे ?
हवाई मार्ग : सर्वात जवळचे विमानतळ कोल्हापूर विमानतळ आहे. जे मंदिरापासून अंदाजे ५० किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग : मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन सांगली रेल्वे स्टेशन आहे, जे मंदिरापासून अंदाजे
३३ किमी अंतरावर आहे. तेथूनच msrtc बस मिळते
रस्ता मार्ग : सांगली पासून ३० किमी/ १/२ तास, नरसोबा वाडी बस स्थानकापासून १ किमी आहे.